पाहतो तिला प्रथमच, आणि क्षणभर वाहून जातो
मग योगायोगाने काही भेटीत, त्या क्षणांचा सागर होऊन जातो
म्हणायचे असते त्याला काही, पण शब्द उरातच राहतात
स्वप्नं काही अशी, अपूर्णच राहतात
तिच्या विचारातच मग तो, कायम हरवला असतो
तिचे डोळे, आवाज, हास्य, ह्यात जणु स्वर्गच भासतो
अखेर ओळख तर होते, पण त्याची पाऊले दचकूनच राहतात
स्वप्नं काही अशी, अपूर्णच राहतात
क्षणभर ही तिला भेटण्यासाठी, बेभान होऊन प्रयत्न करतो
मनातले त्याच्या मात्र, अजूनही श्वासातच भरतो
त्याच्या शांततेतले शब्द, तिच्या नकळतच वाहून जातात
स्वप्नं काही अशी, अपूर्णच राहतात
एका प्रेमकथेसारखे, त्याला मधुर गाणे वाटते सर्वकाही
अस्तित्वात मात्र हे चंद्र-सूर्य आपल्यासाठी उगवत नाही
निघून जाते ती, त्याच्याकडे आठवणीच राहतात
स्वप्नं काही अशी, अपूर्णच राहतात